१३ फेब्रुवारी २०२४
नाशिक (प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासन विभागाने मालेगाव-मनमाड रोडवर एका हॉटेलच्या परिसरात छापा टाकून सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे रंगयुक्त सुपारीचे 11 ट्रक जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिक विभागामध्ये अलीकडच्या काळात झालेली ही कारवाई आहे.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागाच्या गुप्तवार्ता विभागाला मालेगाव-मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्लीकडे रंग लावलेल्या सुपारीची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांनी या रोडवरील वर्हाणे शिवारात हॉटेल हरियाना मेवा ढाबा या ठिकाणी सापळा लावला व काही कालावधीनंतर या परिसरात सुपारी घेऊन जाणारे 11 ट्रक हे मिळून आले.
त्यांची तपासणी केली असता कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व लपविण्यासाठी रंग लावलेली भेसळयुक्त सुमारे 250 टन सुपारी मिळून आली. त्यानंतर उर्वरित ट्रकची तपासणी केली असता सुमारे 252.30 टन अंदाजे किंमत 3 कोटी 84 लाख 19 हजार 983 रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या सुपारीच्या विश्लेषणासाठी नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत.
ही कारवाई अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाचे सहआयुक्त राहुल खाडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, प्रमोद पाटील, योगेश देशमुख, गोपाळ कासार, अमित रासकर, सुवर्णा महाजन, सायली पटवर्धन, नमुना सहाय्यक सचिन झुरडे यांच्या पथकाने केली आहे.
Copyright ©2024 Bhramar