नाशिक शहरात तीन ठिकाणी छापा; लाखों  रुपयांचा  गुटखा जप्त
नाशिक शहरात तीन ठिकाणी छापा; लाखों रुपयांचा गुटखा जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी):- पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत दहा लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर सातपूर येथे केलेल्या कारवाईत 11 हजार रुपयांचा गुटखा सापडला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला  मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सातपूर येथील एमएचबी कॉलनीत पवन संजय कोतकर याच्याकडे धाड टाकली असता या ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित तंबाखुयुक्त पदार्थांचा 11 हजार 272 रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. हा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी  पी.एस. पाटील यांनी तो ताब्यात घेतला. या प्रकरणी पवन संजय कोतकर याच्याविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 328 व अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

काल पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाळकृष्ण सदन, उन्नती हायस्कूलसमोर, पेठरोड या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन  कार्यालयाचे पथक  घटनास्थळी गेले असता तेथे कुलूपबंद आढळून आले. आजूबाजूला चौकशी केली असता जागामालक  शिवाजी मधुकर पवार हे तेथे आले.

त्यांचा जबाब नोंदविला असता हे गोदाम  दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचे सांगितले. परंतु त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला. आजूबाजूस चौकशी केली असता कोणीही उपलब्ध न झाल्याने गोदामाच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता तेथे प्रतिबंधित गुटख्याचे अनेक पोते साठविल्याचे आढळून आले. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या  उपस्थितीत व पंचांच्या समक्ष हे गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी तेथे प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. त्याचे मोजमाप केले असता आतापर्यंत अंदाजे 10 लाखांपेक्षा अधिक रूपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. हा साठा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.

वडाळा नाका परिसरातही एका तरुणाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून सुमारे दीड लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई फरीद इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी अझरुद्दीन हमीद शेख (वय 34, रा. हरीनगरी सोसायटीजवळ, जहागीरदार वाडा, बागवानपुरा, जुने नाशिक) याने वडाळा नाका येथील रेणुकानगर सोसायटीजवळील वॉल कंपाऊंडनजीक 1 लाख 64 हजार 635 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी अझरुद्दीन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गेंगजे करीत आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरु असून यापुढे अन्न व औषध प्रशासनाची जिल्ह्यात गुटख्याविरुध्द कारवाई सुरुच राहणार आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न)  म. मो. सानप व विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी  अ.उ. रासकर,  अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), यो. रो. देशमुख, गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group