नाशिकच्या ‌‘या' मिठाई दुकानावर छापा
नाशिकच्या ‌‘या' मिठाई दुकानावर छापा
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासन विभागाने नाशिकमधील एका मिठाई दुकानातून 18 हजार 450 रुपये किमतीचे भेसळयुक्त श्रीखंड, तसेच सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीवर छापा टाकून भेसळयुक्त खाद्यतेलासह डबे व इतर साहित्य असा 1 लाख 93 हजार 558 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी नाशिकमधील मे. मधुर फुड प्लाझा येथे छापा टाकून विक्रीसाठी प्लॉस्टिक डब्यांमध्ये साठविलेल्या श्रीखंड या अन्नपदार्थांच्या पॅकिंगची तपासणी केली असता त्याच्या लेबलवर बॅच नंबर, उत्पादन केल्याची तारीख, तसेच एक्स्पायरी डेट व कुठे व कोणी उत्पादन केले, त्याबाबतचा संपूर्ण तपशील नमूद केलेला नाही, असे आढळल्याने त्या साठ्यातून नमुना घेऊन उर्वरित 18 हजार 450 रुपये किमतीचा 61.5 किलो शिल्लक साठा हा लेबलदोषयुक्त असल्याने व अप्रमाणित असल्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी जप्त केला.

तसेच सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसीतील अ 13 प्लॉटवरील मे. ईगल कॉर्पोरेशन या ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता खुले खाद्यतेल, तसेच पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये खाद्यतेलाची विक्री तसेच भेसळीच्या संशयावरून, साठा नमुना घेऊन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी जप्त केला. यामध्ये रिफाईण्ड सोयाबीन तेल (खुले) 53 प्लॉस्टिक कॅन (किंमत 93 हजार 335 रुपये) रिफाईण्ड सोयाबीन तेल 41 पुनर्वापर केलेले डबे एकूण 613.4 किलो, (किंमत 62 हजार 566 रुपये), रिफाईण्ड पामोलिन तेल पुनर्वापर केलेले 28 डबे एकूण 418.4 किलो (किंमत 37 हजार 556 रुपये) असे एकूण 1 लाख 93 हजार 558 रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई ही सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड व उदयदत्त लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, श्रीमती सुवर्णा महाजन व अविनाश दाभाडे यांच्या पथकाने नाशिकचे सहआयुक्त सं. भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group