नाशिक : अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाच्या वतीने नाशिकरोडला एका दुकानावर धाड टाकून, यात सुमारे ६१, ६३५ रुपये किमतीचा गुटखा पान मसाला या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांसमवेत अन्नसुरक्षा अधिकारी एस एस पटवर्धन यांनी मे. अथर्व जनरल स्टोअर्स सिद्धार्थनगर, देवळाली गाव, नाशिकरोड येथे तपासणी केली असता विविध प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ६१,६३५ रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याने तो ताब्यात घेतला. त्यामुळे या प्रकरणातील निलेश राजेंद्र भालेराव, ( रा.सिद्धार्थनगर देवळालीगाव ) यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानद कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.
ही कारवाई करण्यासाठी सहाय्यक आयुक्त म. मो. सानप, वि. पा. धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.उ.रास्कर, अविनाश दाभाडे, अन्नसुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता ) एस एस पटवर्धन, पी एस पाटील, उ.रा. सूर्यवंशी यांच्या पथकाने सह आयुक्त ( नाशिक विभाग ) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री करणाऱ्या संबंधिताची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी आवाहन केले आहे.