एफडीएचा शिंदे गावात छापा; अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त
एफडीएचा शिंदे गावात छापा; अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक - शिंदे गावामध्ये एका विक्रेत्यावर छापा टाकून अडीच लाख रुपयांचा प्रतिबंधक गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. या विक्रेत्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आयुक्त अभिमन्यु काळे  यांनी दिलेल्या निर्देशानुसार तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आज शिंदे पळसे गावामध्ये संजय तुळशीराम झाडे, यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली असता या ठिकाणी हिरा पानमसाला व इतर 12 प्रकारचे महाराष्ट्रात बंदी असलेले प्रतिबंधित अन्न पदार्थाचा रु. 2 लाख 56 हजार 265 रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे छाप्यामध्ये समोर आले.

महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी  गोपाल कासार यांनी अनौपचारीक नमुने घेवून ताब्यात घेतला. त्यामुळे या प्रकरणातील विक्रेते झाडे यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात भा. दं. वि कलम 188, 272, 273 व 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित अन्नपदार्थाचे पुरवठादार, उत्पादकापर्यन्त तपास करण्याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न)  विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, श्रीमती सु. दे. महाजन व  अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग)  सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group