भेसळयुक्त दूध विक्री प्रकरणी डेअरी चालकाविरुद्ध गुन्हा
भेसळयुक्त दूध विक्री प्रकरणी डेअरी चालकाविरुद्ध गुन्हा
img
Dipali Ghadwaje

नाशिक  (प्रतिनिधी) : विनालेबलचे भेसळयुक्त औषधी घटक द्रव्याचा साठा करून म्हैस व गाय यांचे दूध वाढविण्यासाठी वापर करणाऱ्या डेअरीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद अशोक वर्मा असे भेसळयुक्त दूध विकणाऱ्या डेअरीचालकाचे नाव आहे. याबाबत औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक प्रवीण दिनकर हारक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी आनंद वर्मा याची पेठ नाक्याजवळ म्हसरूळ-दिंडोरी रोड येथे आनंद डेअरी फार्म हे दूध विक्रीचे दुकान आहे.

आनंद डेअरी फार्म या गोठ्यातील म्हैस व गायीचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसिन या औषधांचा वापर करून जनावरांपासून निघालेल्या दुधाचे सेवन केले असता मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, हे माहीत असूनही विनालेबलच्या भेसळयुक्त औषधी घटक द्रव्याची साठवणूक केली, तसेच या साठ्याचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केली. ही बाब औषध प्रशासनाच्या पथकाने आनंद डेअरी फार्मवर टाकलेल्या छाप्यात लक्षात आली. 

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आनंद वर्मा या डेअरीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group