मुंबई : राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी केली जाणार असून, यात भेसळ आढळल्यास उत्पादक व पुरवठादारावर कारवाई केली जाईल.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की , दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आहे. भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार, बुधवारी राज्यभरातून दुधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविली गेली. नमुन्यात भेसळ आढळल्यास संबंधित दुधाचे विक्रेते, पुरवठादार, उत्पादकांवर कारवाई केली जाईल. शिवाय अशा प्रकाराच्या मोहिमा वारंवार घेतल्या जातील.
नागरिकांना दूध व अन्नपदार्थात भेसळ आढळल्यास एफडीएला माहिती द्यावी. दुधाचे सर्वेक्षण नमुने घेत गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एकूण १०३ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.
१ हजार ६२ दुधाच्या सर्वेक्षणापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रँडच्या दुधाचे ६८० पाऊचमधून व ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचे नमुने आहेत.