ऑल द बेस्ट! आजपासून महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा
ऑल द बेस्ट! आजपासून महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा
img
Dipali Ghadwaje
राज्यात इयत्ता दहावीच्‍या परीक्षेला 1 मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी एकूण 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती पुणे बोर्डाकडून देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान विविध विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी ठेवण्यात आली आहे. बोर्डाच्या माहितीनुसार या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक परीक्षा कालावधीत मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचेपर्यंत, उत्तरपत्रिका आणण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणं आवश्यक असणार आहे.

बोर्डाच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यामिक शाळांमार्फत परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत. सकाळी 11 च्या परीक्षेसाठी 10.30 आणि दुपारी 3 च्या परीक्षेसाठी 2.30 वाजता विद्यार्थ्यांना हजर राहावं लागणार आहे. प्रश्नपत्रिकांचं वाटप 11 आणि 3 वाजताच होणार आहे. तसेच परीक्षेस पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रचलित पध्द्‌तीप्रमाणे सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यासाठी संबंधितांनी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.

अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार
यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहेत. गेल्या वर्षी प्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group