महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात ९४.१० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाल्यानं त्यांच्या घरात अर्थातच आनंदाचं वातावरण असेल, मात्र, २८५ विद्यार्थ्यांची राज्यात आणि सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. चर्चा होण्यामागचं कारणही वेगळं आणि हटके आहे. राज्यातील २८५ पठ्ठ्यांनी काठावर पास होत नवा विक्रम रचला आहे.
राज्यातील महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ११ वाजता पत्रकार परिषद घेत राज्यातील दहावीचा निकाल जाहीर केला. २०२४-२५ वर्षाचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. यातील २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर, राज्यातील २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजेच २८५ विद्यार्थी काठावर पास झाल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
एकूण २८५ विद्यार्थी काठावर पास
पुणे : ५९
नागपूर : ६३
छत्रपती संभाजीनगर : २८
मुंबई : ६७
कोल्हापूर : १३
अमरावती : २८
नाशिक : ९
लातूर : १८
कोकण : ०