दहावीच्या मुलांसाठी फेब्रवारी, मार्च महिना महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीची प्रवेशपत्रे जारी केली आहेत. महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता दहावीची प्रवेशपत्रे संबंधित शाळांमधून मिळू शकतात. ही प्रवेशपत्रे शाळांना अधिकृत वेबसाइट — mahahsscboard.in वरून डाउनलोड करता येतील.
दहावीची परीक्षा प्रवेशपत्रे डाउनलोड केल्यानंतर, शाळांनी विद्यार्थ्यांचे तपशील व परीक्षा केंद्रांबाबत माहिती तपासणे आवश्यक आहे. कोणतीही त्रुटी बोर्डाच्या निदर्शनास वेळेत आणून द्याव्यात जेणेकरून परीक्षा सुरू होण्यापूर्वी चुका दुरुस्त करता येतील.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार आहेत तर इयत्ता १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ला सुरू होणार आहेत.दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू होईल.
प्राप्त माहितीनुसार, परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी यापूर्वी दिली जाणारी १० अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे मिळणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिलेली वेळ रद्द करण्याचा निर्णय हा प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे समोर आल्याने घेण्यात आला आहे.
दरम्यान दहावीचे सकाळचे पेपर सकाळी ११ वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजून १० मिनिटांनी संपतील तर दुपारचे पेपर दुपारी ३ ते ५ वाजून १० मिनिटे या वेळेत होतील. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.