‘अबकी बार, ३७० पार’ या घोषणेनंतरही दक्षिणेसह आठ राज्यांतील १६५ जागांबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता वाढली आहे. प्रामुख्याने भाजपची युती कमकुवत दिसत आहे किंवा युती अपयशी ठरली आहे, अशा जागांचा त्यात समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारसभांमध्ये ‘अब की बार ३७० पार आणि ४ जून को ४०० पार’ची घोषणा देत आहेत; परंतु भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, पंजाब, हरयाणातील सुमारे १६५ जागांवर भाजप आणि मित्रपक्षांची स्थिती चिंताजनक आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्राबाबतही चिंता
भाजप नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रात भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाचे सरकार असून, त्यावर अँटी-इन्कम्बन्सीचा प्रभाव पडणार असल्याचे बोलले जात आहे.
बिहार, ओडिशा, पंजाब मोजावी लागेल किंमत?
बिहारदेखील भाजपसाठी चिंतेचे सर्वांत मोठे कारण आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूशी युती असूनही अहवाल फारसा उत्साहवर्धक नाही. बिहारमध्ये भाजपला ४० पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत; पण जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीबाबत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. ओडिशात बिजू जनता दलाशी युती अयशस्वी झाल्याची तसेच पंजाबमध्ये अकाली दलाशी युती न झाल्याची किंमत भाजपला चुकवावी लागू शकते. हरयाणातही भाजपने चौटाला यांच्या आयएनएलडीसोबतची युती तोडली, त्यामुळे तीन ते चार जागांवर तोटा होऊ शकतो. झारखंडमध्ये हेमंत सोरेन, तर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे नुकसान होऊ शकते.
दक्षिणेकडून अपेक्षा नाही
तेलंगणाशिवाय दक्षिण भारतातील इतर राज्यांकडून भाजपला फारशा आशा नाहीत. आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत युती केल्याने दोन जागांवर फायदा मिळू शकतो. तामिळनाडूतही एक- दोन जागा जिंकता येतील. तेलंगणात चार जागा जिंकण्याची शक्यता आहे.