धुळे : वाहनचोरी प्रकरणी येथील चाळीसगाव रोड पोलिसांनी चौघा अट्टल चोरट्यांना गजाआड केले. त्यात एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून १८ लाख किमतीच्या नऊ रिक्षा व पाच दुचाकी, असा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शहरातील नंदी रोडवरील फिरदोसनगरातील अबुल हसन रियाज अहमद अन्सारी (वय ५६) यांच्या मालकीची रिक्षा (एमएच १५, एफयू २५५८) घरासमोरून २ ऑक्टोबरला चोरीस गेली.
याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून संशयिताला निष्पन्न केले. त्यास मालेगाव (जि. नाशिक) येथून ताब्यात घेतले. अजिजोद्दिन रहेमान मोहम्मद अकिल अन्सारी (वय २४, रा. रमजानपुरा, हैदरअली चौकजवळ, मालेगाव) असे त्याचे नाव आहे.
गुन्ह्याची कबुली
आणखी एका गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यातील आरोपी हेदेखील मालेगाव येथील असल्याने पथकाने संशयित आवेश अहमद आबिद अहमद, एक विधिसंघर्षित बालक व फैजान असरफ सिराज असरफ अन्सारी (सर्व रा. मालेगाव) यांना ताब्यात घेतले. अजिजोद्दिन रहेमान मोहम्मद अकिल अन्सारी त्याच्याकडून एकूण १५ लाख ७५ हजारांच्या एकूण नऊ रिक्षा जप्त केल्या, तर आवेश अहमद आबिद अहमद याच्याकडून दोन लाख ३० हजारांच्या एकूण पाच दुचाकी जप्त केल्या. चौघांनी धुळ्यासह अन्य जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली
दरम्यान पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोडपोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, शरद लेंडे, हरिश्चंद्र पाटील, सुनील पाथरवट, अविनाश वाघ, शोएब बेग, अतिक शेख, विनोद पाठक, सिराज खाटीक, सचिन पाटील, संदीप वाघ, सारंग शिंदे, सूर्यकांत भामरे यांनी ही कारवाई केली.