सावत्र वडिलांनी मित्राच्या मदतीने नऊ वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या केलीय. मुलाचा निर्घृणपणे खून करून मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीये.
मिळालेल्या माहितीनुसार , भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार, या संशयातून सावत्र बापाने त्याच्या मित्राच्या मदतीने हत्याकांड घडवून आणलं. दर्शन वैभव पळसकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर आकाश साहेबराव कान्हेरकर (राहणार हिरापूर ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती) असं मारेकरी सावत्र बापाचं नाव आहे. याशिवाय गौरव वसंतराव गायगोले (रा. हिरापूर ता. अंजनगाव जिल्हा अमरावती.) असं मारेकऱ्याला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
2 जुलै रोजी सकाळी साडे 8 वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता दर्शन घराबाहेर निघून गेला असल्याची आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. मुलाच्या बेपत्ता प्रकरणी आईने तक्रार दिली होती. बेपत्ताप्रकरणी तपास सुरू असतानाच सावत्र वडिलांवर पोलिसांना संशय झाला.. कारण, अकोट शहरातल्या चौकातील नुकतेच लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात वडिलांसोबत मुलगा जात असताना दिसून आलं होतं.. त्यामुळे पोलिसांनी सावत्र वडिलांची कसून चौकशी केली असता त्याने सावत्र मुलाला कायमचं संपवलं असल्याचं बाब समोर आली..
सावत्र वडील आकाश आणि त्याचा मित्र गौरव या दोघा जणांनी दर्शनला दुचाकीवर नेत त्याचा खून केला आहे.. त्यानंतर दर्शनचा मृतदेह अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल परिसरात टाकून दिला. '
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजतात पोलिसांनी काल रात्रीपासून जवळपास 12 तास जंगल परिसरात शोध मोहीम राबवित मुलाचा मृतदेह शोधून काढला आहे. या शोध मोहीममध्ये 7 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, सद्यस्थितीत मृतदेह शव विच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.