अकोला शहरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. काल सायंकाळी एका अल्पवयीन मुलीचा ऑटो रिक्षा चालकाने विनयभंग केलाय. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत मुलीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.
दरम्यान, पीडित मुलगी अकोला मध्यवर्ती बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. त्याच्या तावडीतून सुटकेसाठी तिने प्रतिकार केला. मात्र, रिक्षा चालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतलाय.
त्यानंतर रिक्षातून तिने पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटो चालकाला अटक करीत त्याच्यावर गुन्हे दाखल केले. जाफर खान सुभेदार खान (रा.बकेट कारखान्या जवळ शहनवाजपुरा, नयेगाव, अकोला.) असं अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक 16 वर्षीय विद्यार्थिनी ही अकोला शहरात नीटचे क्लासेस करीत आहे. त्यासाठी तिने राहायला खोली देखील भाड्याने केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. त्यामुळे परतवाडा येथे गावी गेली होती. काल दुपारी बसने अकोल्याकडे रवाना झाली. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ती बसस्थानकावर पोचली. त्यानंतर रूमवर जाण्यासाठी एक ऑटो रिक्षा बघितला. आणि त्यामध्ये बसून रूमकडं रवाना झाली. मात्र ऑटो रिक्षा चालकाने ऑटो वेगळ्याच रस्त्यावर नेला, तिला संशय आला. तिने मित्राला फोनवर सांगितलं.
दरम्यान, अगदी थोड्या वेळातच चालत्या रिक्षात चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःजवळ ओढत तिचा विनयभंग केलाय. पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हातावर आणि हाताच्या दंडाला चावा घेतला.
थोड्या वेळातच तिने सुटका करत ऑटोमधून पळ काढला. लागलीच पीडिता सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल झाली, आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. विशेष म्हणजे मुलीने ऑटो रिक्षा चालकाचा क्रमांक देखील नोंद केला होता. त्यामुळे पोलिसांना ऑटो चालकाचा शोध घेण्यास मोठी मदत मिळाली. कलम 74,118,(1),137 (2) BN. सहकलम 8 पोक्सोनुसार जाफर खान सुभेदार खान याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एमएच 30 ई 9497 या क्रमांकाचा ऑटो देखील ताब्यात घेतला आहे. अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते अनोळखी ठिकाणी ही घटना घडली आहे.