गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या साडेचार महिन्यांपासून मनोज जरांगे लढा देत आहेत. यासाठी त्यांनी तीनवेळा उपोषणही केलं. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे या अधिसुचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनीही उपोषण करत आंदोलन सुरु केलं होतं. मात्र, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. सध्या दोघांनीही उपोषण मागे घेतलं असलं तरी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या एका डॉक्टराला छत्रपती संभाजीनगरमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे.जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये केलेल्या आंदोलनाला विरोध केल्याच्या कारणावरून डॉक्टराच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. डॉ.रमेश तारख यांनी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील आंदोलनाला विरोध केल्याचं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे.
मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं होतं. मात्र, या आंदोलनाच्या विरोधात डॉ.रमेश तारख यांनी प्रशासनाला अर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. डॉ.रमेश तारख यांनी आंदोलनाच्या विरोधात अर्ज दिल्याप्रकरणावरून काही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
डॉ.रमेश तारख यांना आज काही मराठा आंदोलकांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर डॉ.रमेश तारख यांचा सत्कार केला. मात्र, त्यानंतर डॉ.रमेश तारख यांच्या तोंडाला काळं फासलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.