छत्रपती संभाजीनगर : आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी ताकद दाखवावी. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवासाठी लढा, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना दिला आहे.
अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शंभूराज देसाई आले त्यांनी शब्द दिला. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. सरकारवर विश्वास ठेवावा लागेल. मागेपुढे सरकणे सुरू राहते. एक महिना त्यांना हवा होता तो दिला आहे. आता 13 जुलैपर्यंत काहीच बोलायचं नाही.
गोरगरिबांसाठी काम करा
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारने सगे सोयऱ्यांचा जीआर काढू नये, अन्यथा रस्त्यावर उतरु, 57 लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी केली यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना मी काय बोलू. राहू महाराष्ट्रात सगळे उभे. तुम्ही तिकडून आम्ही इकडून आणि ही ताकद त्यांनी आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी दाखवली पाहिजे. विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी ताकद लावा, गोरगरिबांसाठी काम करा. एसटीमधून धनगर बांधवांना आरक्षणासाठी लढा. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवासाठी लढा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
13 जुलैपर्यंत वाट पाहू
मनोज जरांगेंच्या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. यावर ते म्हणाले की, माझ्या चित्रपटाला विरोध होतोय तर होऊ द्या. मला त्यात रस नाही. माझं ध्येय एकच आहे की, कुणाला कुठे कुणाला पाडायचं तर पाडा, आम्ही पण बघू नंतर. समाज लढायला तयार आहे. 13 जुलैपर्यंत वाट पाहू, असे त्यांनी म्हटले आहे.