महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसकडून देखील मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच काँग्रेस नेत्याने केलेल्या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 288 विधानसभा मतदारसंघात आजपासून काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. पण काँग्रेसचा 288 मतदारसंघांसाठीचा प्लॅन तयार आहे, असा दावा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केला आहे.
काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे. अशातच काँग्रेसकडून 288 जागांसाठी तयारी सुरु असल्याचं कळतं आहे. त्यामुळे काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार की हे मित्रपक्षांवर दबावतंत्र आहे? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
निवडणुकीसाठी मुलाखती होणार
आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघात आमचे काँग्रेसचे नेते जाणार आहेत. मुलाखती घेणार आहेत. इच्छुकांचे म्हणणे ऐक्याचे आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अहवाल द्याचे आहे. 288 मतदारसंघांचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. 288 मतदारसंघात आमचे उमेदवार तयार आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुलाखती घेणार आहोत. चाचपणी करतोय अहवाल करणार आहोत, असं वंजारी यांनी सांगितलं आहे.
निवडणुकीच्या आधी स्थानिक पातळीवर चर्चा झाली पाहिजे. स्थानिक लोक, उमेदवार यांचं म्हणणं ऐकायचं आहे. मविआ एकत्र आहे. शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला एखादी जागा नकोय. तर आमचा प्लॅन बी तयार पाहिजे. निकष स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचं काय म्हणणं आहे. सर्व उमेदवारांना समोर बसवून त्यांचं म्हणणं जाणून घेणं महत्वाचं आहे. महाविकास आघाडीत जागांची अदलाबदली झाली आहे. वर्ध्यामध्येही झाली आहे. त्यामुळे आमची तयारी असणं आवश्यक आहे, असं अभिजीत वंजारी म्हणाले.