गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. अनेक आमदार, नेते घरवापसी करत असल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. अशात भाजपला विदर्भातून दूसरा मोठा धक्का बसला आहे.
गोंदियामधील माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत याची घोषणा केली. मी भाजपात असताना पक्षाने मला सोडून विनोद अग्रवाल यांना अधिक महत्व दिलं, त्यामुळे भाजप सोडण्याचा मला निर्णय घ्यावा लागला, असं गोपालदास अग्रवाल म्हणाले आहेत.
त्यामुळे आता गोंदिया विधानसभेत काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल विरुद्ध भाजपचे विनोद अग्रवाल अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच ते कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला हा दूसरा मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान ते भाजपमध्ये दाखल झाले होते. अशात ते पुन्हा घरवापसी करणार आहेत.