लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र आता विधानसभेसाठी मनसे स्वबळावर लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. राज ठाकरे यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला.
दरम्यान मनसेनं नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केलीय. राज ठाकरेंनी नागपूरमधील सर्व 6 विधानभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसे कार्यकर्त्यानी सांगितलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित पाठोपाठ मनसेही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तुषार गिरे हे या मतदारसंघातून मनसेतर्फे निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.