महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी साठी हा निकल धकाकदायक ठरला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीचा जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार, पक्षाला निश्चित मते किंवा आमदार मिळाले नाहीत तर पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते. माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला निश्चित मते किंवा आमदार मिळाले मिळालेलं नाही. गेल्या निवडणुकीत तरी मनसेचा एक आमदार जिंकून आला होता. पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेला या निवडणुकीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत तज्ज्ञांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अनंत कळसे यांनी पक्षाला मान्यता राहावी, म्हणून काय अटी आहेत, याबाबत माहिती दिली आहे.
तसेच “निवडणूक आयोगाचा पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे निकष असतात. 1 आमदार किंवा एकूण मतदानांच्या 8 टक्के मतं मिळाली तर त्यांची मान्यता राहते. 2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं, 3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3 टक्के मतं मिळायला हवीत. या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता राहते. नाहीतर मान्यता काढली जावू शकते”, असं अनंत कळसे यांनी सांगितलं. दरम्यान, या निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? याबाबतही त्यांनी भाष्य केलं.
“निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेवू शकतात. निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतं. सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही”, असं देखील अनंत कळसे यांनी यावेळी सांगितलं. मनसेची पक्षाची मान्यता रद्द होणं म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्रि असतं ते त्यांना घ्यावं लागतं. कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत. पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणाताही परिणाम होत नाही”, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी दिली.