जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही ; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही ; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने जय मालोकारचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याला वेगळं मिळालं असून खळबळ उडाली आहे. 

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे 

अकोला मनसे कार्यकर्ते जय मालोकर याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. गंभीर दुखापत झाल्याने जयचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 30 जुलै रोजी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. यादरम्यान राज ठाकरेंवर भाष्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली होती. या घटनेनंतर त्याच दिवशी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकर याचा मृत्यू झाला होता. पण त्यावेळी मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात होते.

परभणीतील होमिओपॅथीच्या तृतीय वर्षाला असलेल्या जयच्या मृत्यूबाबत मनसेने मिटकरी यांच्याशी झालेल्या तणावपूर्ण वादातून हा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. जयच्या मृत्यूनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. जयच्या मृत्यूपूर्वी तीन तासांत काय घडले याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जयच्या कुटुंबीयांनी केली आहे.  कुटुंबाने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. जयच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा करत पूरस्थितीचा आढावा घेतला होता. ज्यावरून राज ठाकरेंनी त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. ज्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना 'सुपारीबाज' असं म्हटलं होतं. ज्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले होते. 30 जुलैला अमोल मिटकरी हे अकोल्यात आले होते. त्यावेळी मनसैनिकांनी त्यांच्या गाडीची तुफान तोडफोड केली होती. पण त्यानंतर मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group