विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा पराभव सहन करावा लागला असून मनसेला राज्यात एकही खातं उघडता आलेलं नाही. दरम्यान,पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पालघर मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क मारहणीत झालं असल्याचं समोर आलं आहे हा वाद इतका वाढला की, चक्क कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान , ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेत असलेला अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच चव्हाट्यावर आला आहे . पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर 15 ते 20 मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला जातोय.
आज दुपारच्या सुमारास अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच बोईसरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते , तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जखमी असलेल्या मोरे यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे .