राज्यातील घडामोडींना वेग आला असून महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच राज्यसरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी अनेक निर्णय घेतले जातात. दरम्यान आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीजेच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दिवसाचे १२ तास वीज देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे. यातून १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम आम्ही सुरु केले असून आजच्या घडीला यातील ४ हजार मॅगावॅटची निर्मिती पूर्णत्वास आली असल्याचे ते म्हणाले. २०२६ च्या अखेरपर्यंत आम्ही दिवसाचे १२ तासही वीज देण्यासह राज्यात १२ महिने विजेची उपलब्धता करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीप्रश्न मार्गी लागावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सावरता यावे यादृष्टीने देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या नळगंगा-वैनगंगा या प्रकल्पाचे काम यावर्षी सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर तापी मेगा रिचार्ज हा जगातील आश्चर्य असणाऱ्या प्रकल्पाचे काम आपण हाती घेतले आहे. समुद्राला वाहून जाणारे सुमारे ३५ टिएमसी पाणी या प्रकल्पातून आपण आणणार आहोत. बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील खारपान पट्टा क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. येथील लाखो शेतकऱ्यांचे जिवनमान या प्रकल्पातून उंचावले जाईल असे ते म्हणाले.
राज्यातील कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना आपण जागतिक बँकेशी चर्चा करुन सुरु केली. सुरुवातीला आपण 5 हजार गावे यासाठी निवडले. या गावानी साध्य केलेला बदल पाहून जागतिक बँक पुन्हा सहकार्यासाठी तयार झाली. आता त्यांच्या सहयोगातून राज्यातील सुमारे 7 हजार 500 गावात एकात्मिक पद्धतीने काम करुन कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, शेतीसाठी शेतमजूरांचा प्रश्न सर्वत्रच भडसावत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय अधिक भक्कम करुन तो शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.