तब्बल 11 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. श्रद्धा आणि वास्तव यांचा संगम असलेल्या या बहुचर्चित चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाले. विशेष म्हणजे, पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 6 वाजता चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि पहाटेच्या शोसाठीही थिएटरबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पुणे, मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवड, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर ‘देऊळ बंद 2’ची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘बुक माय शो’वर तिकिटांसाठी मोठी मागणी निर्माण झाली असून सोशल मीडियावरही चित्रपटाची चर्चा रंगली आहे. चित्रपटातील भावनिक कथा, प्रभावी संवाद, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं असून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या दमदार अभिनयाने आणि संवादफेकीने प्रेक्षकांना भावनिक केल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील 500 हून अधिक सिनेमागृहांमध्ये 2 हजारांपेक्षा जास्त शो प्रदर्शित झाले असून, मराठी चित्रपटसृष्टीतील हे सर्वात चर्चित ओपनिंग मानलं जात आहे.