चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. मुरादाबाद न्यायालयाने 2017 मधील एका कार्यक्रमाच्या वादाच्या संदर्भात तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमीषा पटेल आहे.
चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांच्यानंतर आता अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2017 च्या एका इव्हेंट वादाशी संबंधित प्रकरणात मुरादाबाद न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मात्र, या बातम्यांवर आता अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अमीषा पटेलने तिच्या इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली. तिने लिहिले, "मीडियामध्ये मुरादाबादमध्ये पवन वर्मा यांनी केलेल्या काही कार्यवाहीबद्दल बातम्या सुरू आहेत. मी सर्वांना सांगू इच्छिते की हे खूप जुने प्रकरण आहे, ज्यात पवन वर्मा यांनी वर्षांपूर्वी समझोता पत्रावर स्वाक्षरी केली होती आणि संपूर्ण सहमती रक्कम प्राप्त केली होती."
तिने पुढे म्हटले, "तरीही त्यांनी खोटे आरोप लावून पुन्हा प्रकरण सुरू केले आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करतील जेणेकरून सत्य समोर येऊ शकेल. मी या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू इच्छिते आणि खोटे बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा लोकांना दुर्लक्षित करेन."