राजपाल यादव बॉलिवूडच्या या कॉमेडियन प्रसिद्ध अभिनेत्याला आज कसलय ओळखीच्या नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकालाच खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव स्वतः मात्र अडचणीच्या काळातून जात आहे. जुने ९ कोटींचे कर्ज प्रकरण आणि त्यावरील व्याजामुळे त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये राहावे लागत आहे.
आता मात्र मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव राजपाल यादवच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहे. टीव्हीएफ (The Viral Fever) जी ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘ये मेरी फॅमिली’, ‘कॉमेडी ऑन डिलिव्हरी’ सारख्या लोकप्रिय वेब सीरिजेससाठी ओळखली जाते त्यांनी राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे.
टीव्हीएफने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट लिहिली आहे. “या कठीण काळात आम्ही राजपाल यादव सर यांच्यासोबत उभे आहोत. राजपालजी, तुमच्या अभिनयाने गेल्या अनेक दशकांपासून करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आम्हाला तुमच्यासोबत एक खास, अर्थपूर्ण वेब सीरिज बनवायला नक्कीच आवडेल. अशी एक सीरिज जिथे प्रेक्षक तुमची ती जादुई कॉमेडी पुन्हा एकदा जवळून अनुभवू शकतील” या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
टीव्हीएफसारख्या मोठ्या आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्मकडून मिळालेली ही ऑफर राजपाल यादव यांच्यासाठी खूप मोठी आशा आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांच्यासमोर कामाची संधी असेल आणि या प्रोजेक्टमधून मिळणाऱ्या कमाईतून ते आपले कर्ज हळूहळू फेडू शकतील, असा चाहत्यांना विश्वास आहे.