आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवणारा राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात आहे. आयुष्याच्या कठीण प्रसंगातून राजपाल सध्या जात आहे. एका चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जामुळे राजपाल यादव मोठ्या अडचणीत आला आहे.
दरम्यान ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्सप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास मनाई केली. त्यानंतर राजपालला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं. मी एकटा पडलोय, माझा कोणी मित्रही नाही.. अशी भावूक प्रतिक्रिया त्याने सरेंडर करण्यापूर्वी दिली होती. त्यानंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतून अनेकजण त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
राजपाल यादवला कोणाची मदत?
कमाल आर खान उर्फ केआरकेनं राजपालची 10 लाख रुपयांची मदत केली आहे.
‘जेमट्युन्स म्युझिक’चे मालक इंदरजीत सिंह यांनी 1.1 कोटी रुपयांची मदत केली आहे.
जनशक्ती जनता दलचे (JJD) प्रमुख तेज प्रताप यादव यांनी घोषणा केली की ते राजपाल यादवची 11 लाख रुपयांची मदत करणार आहेत.
गुरमीत चौधरी, सलमान खान, वरुण धवन, अजय देवगण, गुरू रंधावा आणि सोनू सूद यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु ते किती पैशांची मदत करतील, याचा खुलासा त्यांनी केला नाही.
राजपाल तुरुंगातून बाहेर कधी येणार?
इंदरजीत सिंह यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात त्यांनी राजपाल यादवच्या छोट्या भावाशी चर्चा केली होती. या व्हिडीओत त्यांनी हेसुद्धा सांगितलं की 14 फेब्रुवारीपर्यंत ठराविक रक्कम जमा झाली नाही तर ते स्वत: उर्वरित रक्कम कोर्टात जमा करतील. जेणेकरून महाशिवरात्रीपर्यंत राजपाल यादवची तुरुंगातून सुटका होऊ शकेल. तर दुसरीकडे राजपालच्या मॅनेजरने सांगितलं की 12 फेब्रुवारी म्हणजेच आज त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.