'ती' जागा भाजपचीच, उमेदवार आमच्याच चिन्हावर लढणार ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
'ती' जागा भाजपचीच, उमेदवार आमच्याच चिन्हावर लढणार ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
img
दैनिक भ्रमर
अमरावती लोकसभेच्या उमेदवारीला घेऊन भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. महायुतीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान आता फडणवीस यांनी त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत या जागेवर भाजपचाच दावा प्रबळ असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमरावतीची जागा भाजपच लढवणार असून जो कोणी उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावरच लढेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते बुधवारी (दि. २०) अकोला येथे भाजप लोकसभा निवडणुक संचालन समितीच्या बैठकीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.

खासदार नवनीत राणा या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार का, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नवनीत राणा संपूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्यात. त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकतीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडली आहे. पण, असे असले तरी उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय आमचे पार्लमेंटरी बोर्ड किंवा इलेक्शन कमिटी घेते, असे त्यांनी सांगितले.

दिल्लीत होणार 'हा' निर्णय! आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी अमरावतीची जागा शिवसेना शिंदे गटालाच सुटेल असा दावा केला आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, जी जागा महायुतीमध्ये भाजपला सुटेल तिथे शिवसेना व राष्ट्रवादी त्यांचा प्रचार करणार आहे, तर याच पद्धतीने शिवसेनेला जी जागा सुटेल त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी त्यांचा प्रचार करेल तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला जागा सुटेल त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना त्यांना मदत करेल असे त्यांनी सांगितले.

आमदार राणांच्या ‘त्या’ चिठ्ठीची चर्चा

दरम्यान तत्पूर्वी सकाळी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार रवी राणा यांनी धावती भेट घेतली. पुष्प देऊन राणा यांनी फडणवीस यांचे स्वागतही केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक चिठ्ठी देखील दिली. त्यामध्ये काय होते, याबाबत दिवसभर वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. दरम्यान या भेटीनंतर आमदार रवी राणा हे तातडीने मुंबईला रवाना झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group