पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरजवळ परिसरात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोनक पवार (वय ६) असं मृत चिमुकल्याचे नाव आहे. नांदगाव खंडेश्वर परिसरातील गाळेगाव-जगतपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहे. या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत या खड्ड्यांमध्ये पडून आतापर्यंत ४ बालकांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावं अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र, तरीही बांधकाम विभागाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच रोनकचा मृत्यू झाला, असे आरोप नातेवाईक करीत आहेत.
नेमकं काय घडले?
खंडेश्वर परिसरात राहणाऱ्या रोनकची आई पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरातील विहिरीकडे निघाली होती. यावेळी रोनक देखील आईच्या पाठीमागे जात होता. दरम्यान, आई पुढे गेली असताना रोनक हा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रोनकचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रोनकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रोनकचा जीव गेला, अशी टीका परिसरातील नागरिक करीत आहेत.