नाशिक (प्रतिनिधी) :- सुमारे नऊ दरोडेखोरांच्या टोळीने नांदगाव तालुक्यात जळगाव खुर्द शिवारातील दत्तात्रय सजन डोखे यांच्या राहत्या घरावर दरोडा टाकून सुमारे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोकड असा किमान 3 लाख 23 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटून नेला.
या प्रकरणी सरोदे वस्ती जळगाव खुर्द येथील रहिवासी आप्पा महारू सरोदे यांनी नांदगाव पोलिसांकडे दरोड्याची तक्रार नोंदविली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की गेल्या गुरुवार दि. 19 च्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नऊ दरोडेखोरांच्या टोळीने दत्तात्रय सजन डोखे यांच्या घरात प्रवेश केला व चाकूचा धाक दाखवून डोखे व आप्पा महारू सरोदे यांच्या कुटुंबीयांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने खेचून पोबारा केला. या प्रकरणी आप्पा महारू सरोदे यांनी दि. 20 रोजी नांदगाव पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारीतील वर्णनानुसार दत्तात्रय सजन डोखे यांच्या पत्नीची एक तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ, चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, पायातील चांदीचे जोडवे, सोन्याचे एक तोळ्याचे मणीमंगळसूत्र व एक तोळे वजनाचा सोन्याचा वेल व टॉप्स, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कुडके, पायातील चांदीचे जोडवे, एक तोळे वजनाची लहान पोत, नातवाच्या गळ्यातील सोन्याचे ओम्पान, महिमा डोखे यांच्या अंगावरील एक तोळ्याचे मणीमंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची बारीक पोत, कानातील सोन्याचे तीन ग्रॅमचे टॉप्स, तसेच लीलाबाई सजन डोखे हिच्या कानातील एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कुडके आणि गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र यासह 29 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लुटून नेल्याचे पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास नांदगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.