मुलींना बरोबरीचा अधिकार देत असल्याचा डांगोरा पिटणारा आपलाच समाज मुलीच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक अपराधांकडे सपशेल डोळेझाक करताना दिसून येतो. यात महिलांवरील बलात्कार , ऍसिड अटॅक , मुलींचे अपहरण या गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी ही धक्कादायक आहे. त्यात आता आणखी एका धक्कादायक वास्तव्याची भर पडली आहे.
खेळायच्या, बागडायच्या आणि शाळेत जायच्या दिवसात चिमुकल्या मुलींना चक्क काही हजारात विकत घेतलं जातंय, हे अंगावर शहारे आणणारं वास्तव आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातलं. यामागंच कारणही तेवढंच धक्कादायक आहे. सध्या लग्नासाठी मुलांना मुली भेट नाही, खासगी नोकरी करणा-या तरूणांनाचंही सहजासहजी लग्न होत नाही, एकतर मुलगा सरकारी नोकरीला हवा किंवा खासगी कंपनीत त्याचं पॅकेज 15 किंवा 20 लाखांचं हवं, हे झालं नोकरीवाल्या तरूणांचं.
मात्र, नोकरी नसणा-या तरूणांनी काय करायचं? त्यांची लग्न कशी व्हायचीत? त्यासाठी काही एजंट पालघरच्या आदिवासी भागात अॅक्टिव्ह आहेत. जे नवरामुलाकडून लाखो रूपये घेतात आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुटुंबाना केवळ हजारो रूपये देऊन त्यांच्या मुलींचा सौदा करत आहे. तुमच्या मुली सुखात संसार करतील मुलगा नोकरी करतो अशी अमिषं दाखवून अशिक्षित वाड्या-वस्त्यावरील आदिवासी कुटुंबाची सर्ऱासपणे फसवणूक केली जात आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने ही बाब समोर आणली आहे. वाडा-भिवंडी भागातल्या आदिवासी पाड्यांवर कोवळ्या मुलींची लग्नासाठी विक्री होत असल्याची बाब पुढे आणली. या टीमनं तातडीनं या भागात जाऊन माहिती मिळालेल्या प्रकाराची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. पालघर आणि तिथून वाडा तालुक्यात. शहरातील गगनचुंबी इमारती मागं टाकून टीम पालघरमधील आदिवासी भागात पोहोचली.
येथील एका पीडीत मुलीची झोपडी म्हणजे शब्दशः गवताच्या भींती. गवताचं छप्पर. घरात चार भांडीकुंडी आणि एका बाबूंच्या आडव्या काठीवर टाकलेले कपडे. पीडित मुलगी जेमतेम 14 ते 15 वर्षांची अन तिच्याजवळ दोन वर्षांची मुलगी. पाहणा-या कुणालाही वाटेल पीडित मुलीची ती बहीण असावी... पण तसं नव्हतं. ती 15 वर्षांची मुलगी त्या चिमुरडीची आई होती. जवळपास तीन वर्ष त्या मुलीनं नरकयातना भोगल्या होता. ही पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरी राहायला होती. आईवडील कायम वीटभट्टीवर कामाच्या निमित्तानं गावापासून दूर होते. एकदिवस गावातला कोर नावाचा दलाल तिच्या आजीकडं आला. आजीला काय सांगितलं माहिती नाही. दरम्यानच्या काळात पीडितेची आजी वारली. तरीही कोर नावाच्या दलालानं तिला घेऊन संगमनेर गाठलं. कारण कोरनं या मुलीचा 50 हजारांत सौदा केला होता. अवघ्या 50 हजारांत या कोवळ्या मुलीची विक्री झाली.
पीडित मुलीला याची कल्पनाही नव्हती. लग्न ठरवायला लावलंय याची कल्पना तिला आली होती. आहिल्यानगरच्या संगमनेर गावात पीडित मुलीला घेऊन गेले.आधी हळदी कुंकू करु असं सांगितलं आणि एका बेसावध क्षणी लग्न लावून दिलं. आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहील, जे सुख आपण आर्थिक परिस्थितीमुळे देऊ शकलो नाही ते लग्नानंतर मिळेल या भ्रमात राहून आई-वडील एजंटच्या अमिषाला बळी पडतात. पण त्यांना काय माहित, मिळालेल्या पैशांच्या बदल्यात त्यांच्या चिमुकलीच्या नशिबात फक्त आणि फक्त छळच लिहिलेला असेल...
जव्हार तालुक्यात एका आदिवासी कुटुंबासोबत असाच धक्कादायक प्रकार घडलाय. 14 वर्षाची नीलम एका एजंटमार्फत जळगावच्या सचिन पाटीलसोबत त्र्यंबकेश्वरमध्ये तिचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर नीलम गरोदर राहिली.. मात्र, तिच्या सासरच्यांनी गर्भपात करून नीलमला तिच्या माहेरी पाठवून दिलं.
पालघरच्या आदिवासी भागात एजंटमार्फत अनेक मुलींचा सौदा केला जातो.एजंट लाखो रूपये घेऊन आदिवासी समाजातील मुलींची लग्न लावून देतात. मात्र, नंतर त्यांचं काय होतं? त्या कशा राहतात याकडे ढुंकूनही बघत नाहीत. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातील भीषण परिस्थितीमुळे इथली कुटुंबं आपल्या मुलींची केवळ 40 ते 50 हजारांसाठी लग्न लावून देतात. आपली मुलगी कोणाला देतोय? तो कुठे राहतो? याची साधी कल्पना देखील त्यांना नसते. या दोन्हीही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून चार्जशीट दाखल केलीय, आरोपींसह एजंटलाही पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.
आदिवासीबहुल या भागातल्या वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडीत अशी अनेक प्रकरणं आहेत. ज्यात अल्पवयीन मुलींची लग्न करून त्यांचा सौदा केला जातोय.देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिसरात पालघर आणि ठाण्याचा आदिवासी भाग आहे. या आदिवासी भागाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. बालमृत्यू आणि कुपोषण इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजलंय. आईच्या पोटात असल्यापासून इथल्या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष येतो. जन्मताच जगण्याचा संघर्ष... तिथंही मृत्यूला हुलकावणी दिली की कुपोषणाचा विळखा पडतो. त्यावरही मात केली की इथल्या आदिवासी मुलींचा चक्क सौदा मांडला जातो.