आता राज्यात धो - धो कोसळणार !  ''या'' 11 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
आता राज्यात धो - धो कोसळणार ! ''या'' 11 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
img
Nandini khandare More

बहुप्रतीक्षित मान्सून ने अखेर आपले दर्शन दिले असून आता राज्यात धो -धो पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत .  भारतीय हवामान विभागाने पुढली काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषत: कोकण आणि घाट भागात पाऊस कोसळणार आहे. तर महाराष्ट्राच्या इतर भागात देखील पावसाचा जोर राहील. आज 1 जुलै रोजी 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. 

कोकण विभागात पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मंगळवार जोरदार पाऊस झाला. आज या जिल्ह्यांना पुन्हा ऑरेंज अलर्ट, तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस होईल. ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष अलर्ट नसला तरी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 2 जुलैपासून या भागात देखील पावसाचं धुमशान सुरू होईल. ताशी 40-50 किमीने वारे वाहून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांतही ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे आणि पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. 

एकंदरीत हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहू शकतात. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि जोरदार पाऊस व वादळी वाऱ्याच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group