महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर, राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याचंही पाहायला मिळत आहे.
यारम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
'या' भागांत जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केले आहे.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपतीसंभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. उद्यापासून पुढील 3 दिवस या जिल्ह्यांतही पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे.
सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट भागांसाठी भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शहरात आणि आसपासच्या भागात सतत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून, सखल भागात पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.