१३ जून २०२४
नाशिक (प्रतिनिधी ) : नाशिक शहरात आज दुपारच्या सुमारास सुमारे दीड ते दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. रस्त्यावर देखील पाणी साचल्याने वाहन चालकांची तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. सिडको, अंबड, सातपूर भागात विजेच्या कडकडाटसह पावसाचा जोर वाढल्याने वादळी वाऱ्यात काही ठिकाणी झाडे देखील मिळून पडली.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे दिसून यत आहे. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात विजांच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने नागरिकांची तसेच रस्त्यावरील छोटया व्यवसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
नाशिक शहरात पावसाने दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी काही ठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, पावसाने शहरातील सिडको, सातपूर, सीबीएस, शालीमार या परिसरासह आदी भागांत हजेरी लावली. तसेच पावसासोबतच जोरदार वारे असल्याने काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडल्याची घटना घडली. तर सिडको, कामटवाडे, पाथर्डी आदि भागातील काही रस्त्यांवर पहिल्याच पावसात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
Copyright ©2024 Bhramar