पुणे : पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या सखल भागात पाणी साचून ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता शहरातील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालये वगळता इतरांनी कामकाज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रासह घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पुढील 24 तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.