पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; बाळासाहेब थोरातांच्या भावासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल
पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण; बाळासाहेब थोरातांच्या भावासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सरकारी कार्यालयातच एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संगमनेर पंचायत समितीच्या कार्यालयात घुसून तालुका अभियान व्यवस्थापकाला काही जणांनी मारहाण केली. या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद नाना थोरात यांच्यासह ९ ते १० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.



माहितीनुसार, काही व्यक्तींनी थेट पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत संबंधित अधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, घटनेच्या वेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शरद थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झाला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group