कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवीशक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो. घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो. असे सांगून लोकांकडून रुपये उकळणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. गडगे विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर संबंधितांनी सोशल मीडियात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हिडिओ शेअर केला होता.
राजेंद्र बापू गडगे याने संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून 'दत्तधाम सरकार' नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत होते.
संगमनेरमधील दत्तधाम सरकार नावाने गडगे महाराज याने साम्राज्य उभे केले. भोळ्या भक्तांना फसवून त्याने हजारो रुपये उकळले. कोणतेही मेडिकल सायन्स माहिती नसताना त्याने भक्तांना आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळण्यासाठी नाटक केले. या माध्यमातून त्याने लाखोंची संपत्ती जमा केली.
लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन तो अनेकांकडून ११ हजार, २१ हजार, ५२ हजार, अशा रकमा घेऊन फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि अंनिसने त्याच्यावर कारवाईची मागणी केली. राजेंद्र गडगे याच्याबरोबरच त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे, डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी (IT) ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.