पंढरपूर : बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकाचा ठेका मिळाल्यापासून ही कंपनी सतत कोणत्या ना कारणावरून चर्चेत आहे. अशातच आता पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांच्या भावनेशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , चक्क भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून विक्री करण्याचा गोरख धंदा उघडकीस आला आहे.
विशेष बाब म्हणजे मंदिर समितीकडे काम करताना या खासगी सुरक्षा रक्षकाचा तीर्थ विक्रीचा धंदा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला असून हा व्हीडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.
वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये आलेले भाविक चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून मोठ्या श्रद्धेने प्रशासन करतात. मात्र पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक लूट केली जाऊ लागल्याच्या या प्रकारातून समोर आले आहे. ही लूट मंदिर समितीकडे सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच करावी ही बाब त्याहून वाईट मानली जात आहे.
दरम्यान यापूर्वी याच कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. आषाढी वारी काळात सुरक्षा कर्मचाऱ्याने वशिल्याचे दर्शन दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता याच कंपनीच्या सुरक्षा कर्मचार्याने तीर्थ म्हणून पाणी विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता याप्रकरणी नेमकं काय कारवाई केली जाते ते बघणं महत्वाचं ठरेल.