सध्या राज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. त्यामुळे शाल, स्वेटर, कानटोपी आता सर्वाकडे पहायला मिळतेय. हेच नाहीतर तर विठुरायाने देखील आता सुती उपरणे आणि शाल पांघरलीय. रुक्मिणी मातेलाही उबदार काश्मिरी शाल परिधान करण्यात आलीय. थंडीचा कडाका वाढत चालल्याने देवाला उबदार कपडे देण्यास सुरुवात होते .
या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते. साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्यात येत असून साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात.
रात्री शेजारातीनंतर विठुराया जेंव्हा निद्रेसाठी जात असतो तेंव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो. देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते .
देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते. देवाच्या उघड्या अंगावर पांढरा शुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात येतो . यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार शाल अंगावर टाकून त्यावर खास काश्मिरी रजई घालण्यात येते.
यानंतर देवाला तुळशीहार घालून आरती करीत देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते . पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील ही काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात .