भारताने श्रीलंकेत पहिल्याच कसोटी सामन्यात मोठी बाजी मारली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने गॉल टेस्टमध्ये विजय मिळवला असून मालिकेत 1-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
अंतिम दिवशी श्रीलंकेला विजयासाठी कठीण आव्हान मिळाले होते, परंतु भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्यासमोर यजमान संघाचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतही आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीतील विजयामुळे भारताच्या खात्यात 12 गुणांची भर पडली आहे. सामन्यापूर्वी भारताचे 52 गुण होते. आता हे गुण 64 झाले आहेत. तसेच भारताची विजयाची टक्केवारी म्हणजेच पीसीटी 48.15 टक्क्यांवरून 53.33 टक्क्यांवर पोहोचली आहे. मात्र या शानदार विजयानंतरही डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताच्या स्थानात बदल झालेला नाही. टीम इंडिया पाचव्या स्थानावरच कायम आहे.