एका मद्यपी पित्याने आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला केवळ चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून गळा दाबून मारून टाकल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरासह राज्याभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , लातूर जिल्ह्यातील उदगीर तालूक्यातील भीमा तांडा येथे रविवारी ही घटना घडली. आरोपी बाप बालाजी राठोड दारू पित असल्याने त्याचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी टोकाचे वाद होत होते. त्यात रविवारी देखील त्यांचे वाद झाले होते.
त्यामुळे पत्नी वर्षा नवऱ्याला सोडून वडिलांकडे राहायला गेली होती. त्यावेळी त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीने बालाजीला चॉकलेटसाठी पैसे मागितले असता त्याने नकार दिला. मात्र ती हट्ट करू लागली. तेव्हा त्याने तिचा दोरीने गळा आवळून हत्या केली.
हा सर्व प्रकार मुलीच्या आईला कळाला असता तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पत्नीने या पतीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर पोलिस आता पुढील तपास करत आहेत.