गूगलने आपल्या प्रसिद्ध वेब ब्राऊझर Chrome संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल डिव्हाइसेससाठी Chrome चं सपोर्ट बंद होणार आहे. याचा अर्थ असा की, या अँड्रॉइड व्हर्जन्सवर Chrome ला ना कोणतेही अपडेट्स मिळतील, ना सुरक्षा पॅचेस, ना नवीन फीचर्स.
कोणते डिव्हाइस होणार प्रभावित?
जर तुम्ही अजूनही Android 8 किंवा Android 9 वर चालणारा मोबाईल वापरत असाल आणि Google Chrome वापरत असाल, तर तुम्हाला लवकरात लवकर फोन अपडेट करण्याची गरज आहे. Chrome 139 चा नवीन अपडेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 ऑगस्ट 2025 च्या सुमारास रिलीज होणार आहे. त्यानंतर फक्त Android 10 आणि त्यापेक्षा वरच्या व्हर्जन्सवर चालणाऱ्या डिव्हाइसेससाठीच Chrome चे अपडेट्स मिळतील.
Android 8 किंवा 9 वापरणाऱ्या यूजर्ससाठी Chrome 138 हे अंतिम वर्जन ठरेल. म्हणजे यानंतर कोणतीही सुधारणा, सुरक्षा अपग्रेड्स किंवा नवीन फिचर्स मिळणार नाहीत.
काय परिणाम होणार आहे?
Chrome लगेचच काम करायचं थांबवणार नाही. पण त्याला भविष्यात कोणतेही अपडेट्स न मिळाल्याने बग्स, सिक्युरिटी लूपहोल्स आणि डेटा रिस्क वाढू शकते. विशेषतः जे वापरकर्ते इंटरनेटवर बँकिंग, ईमेल्स किंवा अन्य संवेदनशील काम करतात त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं.
गूगलने आपल्या अधिकृत सपोर्ट पेजवर सल्ला दिला आहे की, “यूजर्सनी Android 10 किंवा त्यावरील वर्जनमध्ये लवकरात लवकर अपग्रेड करावं, जेणेकरून त्यांना Chrome चा पूर्ण अनुभव मिळत राहील.”
किती युजर्सवर होईल परिणाम?
एप्रिल 2025 पर्यंतच्या डेटा नुसार, Android 9 अजूनही सुमारे 6% अँड्रॉइड युजर्स वापरत आहेत, तर Android 8 आणि 8.1 मिळून 4% लोक अजूनही त्या वर्जनवर आहेत. याचा अर्थ, सुमारे १०% अँड्रॉइड युजर्स यापुढे Chrome अपडेट्सपासून वंचित राहतील.
आता काय करावं?
जर तुमचं डिव्हाइस Android 10 किंवा त्यावर अपग्रेड होण्यायोग्य असेल, तर आता तो योग्य वेळ आहे. जुन्या Chrome ब्राऊझरमध्ये इंटरनेट सर्फिंग करताना तुमचा डेटा सुरक्षित राहीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे तुमचं डिव्हाइस जर सपोर्ट करत असेल, तर आजच सिस्टम अपडेट तपासा.