भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि युवा स्टार पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निरोप घेत, आगामी हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची ताकद यामुळे अधिक बळकट होणार आहे.
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पृथ्वीने जुलै 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरोधात खेळला होता. त्यानंतर मात्र त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळाली नाही. आता पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या तयारीत व्यस्त आहे.
पुढील हंगामात तो मुंबईकडून खेळताना दिसणार नाही. त्याच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोमवारी प्रेसनोट प्रसिद्ध करुन या निर्णयाची माहिती दिली.
पृथ्वी शॉ आता महाराष्ट्र क्रिकेट टीमचा भाग बनला आहे. ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी यांसारखे स्टार खेळाडू महाराष्ट्राच्या संघात आहेत. आता या संघात पृथ्वीची एन्ट्री झाल्याने संघाची ताकद वाढली आहे.
याबाबत पृथ्वी म्हणाला,की माझ्या करिअरचा विचार करता हा निर्णय माझ्यासाठी सकारात्मक आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मी कायम आभारी राहिल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलीकडच्या वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रिकेटच्या विकासात चांगलं काम केलं आहे. मी ऋतुराज गायकवाड, अंकित बावने, राहुल त्रिपाठी यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळणे माझ्यासाठी उत्साहवर्धक राहणार आहे.