बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराड याला अटक केली आहे. अशातच आता आणखी एका प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडवर आरोप केले होते.
वाल्मिक कराड यानेच महादेव मुंडे आणि त्यांच्या हत्येचा आयव्हिटनेस असलेल्या व्यक्तीला संपवलं असा आरोप बाळा बांगर यांनी केला होता. एवढंच नाही तर मला देखील जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, असा दावा देखील बाळा बांगर यांनी केला आहे.
दरम्यान बाळा बांगर यांच्या आरोपांनंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे?
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. न्याय मिळायला हवा यासाठी मी सर्व नेत्यांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्री यांच्यावर पुर्ण विश्वास आहे, पण मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन जायचे, त्यामुळे वाल्मिक कराडच्या भितीपोटी पोलिसांनी तपास थांबवला असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धनुभाऊंनी खरं तर भूमिका घ्यायला हवी होती, पण त्यांनी ती घेतली नाही, मला याची खंत आहे.