दैनिक भ्रमर : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण डिजिटल शिक्षणाचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी खान अकॅडमी इंडिया आणि महाराष्ट्र सरकार पुढे आले आहे.
आता राज्यातल्या सरकारी शाळांमधील मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित, चांगल्या दर्जाचे डिजिटल शिक्षण साहित्य खान अकॅडमी इंडिया आणि महाराष्ट्र सरकारमोफत देणार आहे. यासाठी 5 वर्षांचा करार झाला आहे. डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत, खान अकॅडमीचे डिजिटल साहित्य राज्यातल्या 62,000 पेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये वापरले जाईल.
या कार्यक्रमांतर्गत, राज्यातील विद्यार्थ्यांना खान अकॅडमीचे जागतिक दर्जाचे, राज्य अभ्यासक्रमाशी पूर्णपणे संलग्न असलेले गणित आणि विज्ञानाचे साहित्य मराठी आणि इंग्रजी भाषेत आयुष्यभर विनामूल्य उपलब्ध होईल. या करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.