राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेला पाऊस , झालेली अतिवृष्टी , डोळ्यांदेखत उभ्या पिकाचं नुकसान , अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेलेला संसार खूप पाहिलं डोळ्यांनी. आभाळ फाटल्यागत अश्रूंचा बांध फुटला. पण बापमाणूस सोबत आहे तर थोडी काळजी कमी झाली. पण या राक्षसी पावसाने हतबल झालेला बाप तोही सोडून गेला. सोलापुरात झालेल्या दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी दोन कुटुंब पोरकी झाली आहेत.
शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोक्यावरील बॅंकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, घरखर्च या विचारांनी त्रासलेल्या बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावातील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद भागवत गंभीर (वर्षे ३९) व लक्ष्मण काशीनाथ गावसाने (वर्षे ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, शरद गंभीर हे दोन-तीन दिवसापासून नैराश्येत होते. त्यामुळेच शरद यांनी बुधवारी शेतातील घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहली होती. त्यात ‘पाऊस सारखा पडत आहे, पावसामुळे माझ्या शेतात पाणी साचले, पिकांचे मोठे नुकसान झाले, आता माझ्यावर असलेले कर्ज कसे फेडू, मुलांच्या शिक्षणाचे कसे होईल, मला माफ करा, माझ्या मुलांची काळजी घ्या’, असे भावनिक मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे.
दुसरीकडे दहिटणे येथील लक्ष्मण गावसाने हे वैरागला बाजारला जातो, असे सांगून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले . मात्र दुपारनंतरही ते घरी न आल्याने त्यांच्या बायकोने दिर सागर गावसाने यांना नवऱ्याचा फोन लागत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सागर यांनी भावाचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. भावाचा शोध घेण्यासाठी मोबाईलवर स्टेटस ठेवले होते.
दरम्यान, सासुरे येथील सज्जन करंडे यांनी सागर गावसाने यांना बुधवारी सकाळच्या सुमारास फोन केला. यादव यांच्या शेतातील झाडाला एकाने गळफास घेतला आहे, तो तुमचाच भाऊ आहे का? याची खात्री करा, असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात खात्री केली असता सागर यांचा भाऊ लक्ष्मण असल्याचे स्पष्ट झाले. आत्महत्या केलेल्या दोन्ही शेतकऱ्यांचं ओल्या दुष्काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या दोघांच्याही मागे त्यांचं कुटुंब आहे. आत्महत्या हा पर्याय नाही मागे उभं कुटुंब आहे. पण हतबलतेला पर्याय काय ? सरकारची तुटपुंजी मदत लाखोंचं नुकसान कशी भरून काढेल ? हा प्रश्न मात्र राहील.