‘या’ कफ सीरपच्या विक्री, वितरण अन् वापरावर अन्न व औषध प्रशासनाचे निर्बंध
‘या’ कफ सीरपच्या विक्री, वितरण अन् वापरावर अन्न व औषध प्रशासनाचे निर्बंध
img
वैष्णवी सांगळे
कोल्ड्रिफ सीरप बॅच नं एसआर-13 औषधाच्या वापरामुळे मध्यप्रदेश व राजस्थान राज्यात काही बालकांचे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे अन्न व औषध प्रशासनामार्फत या कोल्ड्रिफ कफ सीरपची विक्री, वितरण अन् वापर करणे तत्काळ थांबविण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाचे राज्य औषध नियंत्रक दा.रा.गहाणे यांनी दिल्याची माहिती नाशिक विभाग  सह आयुक्त (औषधे) सु.सा. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांना मध्यप्रदेश व राजस्थान येथील काही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्राप्त अहवालानुसार  मृत्यूचे कारण कोल्ड्रिफ कफ सीरप, बॅच नं.एसआर-13, निर्मिती दिनांक मे 2025, कालबाह्य दिनांक एप्रिल 2027 हे असल्याचे समोर आले आहे. हे औषध कांचीपुरम (तामिळनाडू) येथील स्त्रेसन फार्मा या उत्पादक कपंनीने तयार केले असून यात डायइथायलिन ग्लायकोल (DEG) हा विषारी पदार्थ आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

या औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत तामिळनाडू येथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून माहिती घेण्यात येत असून राज्यातील विक्रेते, वितरक आणि रूग्णालये यांनी या औषधाचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता सर्व साठा गोठवावा. नागरीकांनी या औषधाचा वापर त्वरीत थांबवावा तसचे कोल्ड्रिफ सीरप बॅच नं एसआर-13 चे विक्री व वितरण ताबडतोब बंद करावे. हे औषध कुणाकडे उपलब्ध असेल तर स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणास याबाबत त्वरीत कळवावे. या औषध साठाबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800222365 वर, jchq.fda-mah@nic.in या ईमेलवर अथवा 9892832289 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group