एका औषधाने देशात सध्या सर्वाचीच झोप उडवली आहे. विषारी कफ सिरपमुळे यापूर्वीही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असताना आता पुन्हा एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून धानी डेहरिया या 18 महिन्याच्या चिमुकलीला गंभीर स्थितीत उपचारासाठी नागपूरमध्ये दाखल करण्यात आले होते.

यात किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धानीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. धानी डेहरियाच्या मृत्यूनंतर कफ सिरपमुळे नागपुरात उपचार दरम्यान एकूण मृत्यूसंख्या हि दहावर पोहचली आहे.
दरम्यान, कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतलाय. तर 'एम्स नागपूर'च्या नेतृत्वात केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊनही पाहणी केलीय.
कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित झाली आहेत. केंद्रीय पथक पुढील तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान या गंभीर प्रकरणी आता केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’च्या वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
काय आहे Dextromethorphan Hydrobromide Syrup?
1950 च्या दशकात शोध लागलेले हे औषध सुरुवातीला कोडेन याला पर्याय म्हणून वापरले गेले. हे मुख्यत्वे कोरड्या खोकल्यासाठी दिले जाते. याचा प्रभाव म्हणजे खोकल्याचे संदेश मेंदूपर्यंत जाण्यापासून रोखणे, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. केमिकल प्रोसेसिंग हे औषध तयार केले जाते आणि लहान मुलांना सहजपणे प्यायला यावे म्हणून ते सिरपच्या स्वरूपात दिले जाते.
पालकांसाठी सूचना
जर मुलाला किंवा रुग्णाला यापूर्वी लिव्हर, किडनी किंवा इतर गंभीर आजार असतील, तर हे औषध देण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पालकांनी बाजारात सहज मिळणारे सिरप मुलांना देण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर तपासावा.