दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा, प्रसिद्ध आणि आनंददायी सण मानला जातो. अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि दुःखावर आनंदाचा विजय हे या सणामागील मूलभूत तत्त्व आहे. दिवाळीत घरांची स्वच्छता केली जाते, दिवे लावले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक कपडे परिधान केले जातात, गोडधोड पदार्थ खाल्ले जातात आणि लक्ष्मी पूजन केले जाते.

पण गेल्या काही वर्षांपासून या सणात फटाके फोडण्याची प्रथा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जी पर्यावरणासाठी आणि समाजासाठी हानिकारक नुकसान दायक ठरत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग वाढून मानवी आरोग्य धोकात येतं आहे, त्यामुळे उत्तम दीर्घायुष्यासाठी आजच्या काळात फटाके मुक्त पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम
प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे परिणाम
फटाके फोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि इतर विषारी वायू हवेत मिसळतात. त्यामुळे हवा दूषित होते. ही दूषित हवा श्वासावाटे शरीरात गेल्यास फुप्फुसांचे आजार, दमा, अॅलर्जी यासारख्या समस्या निर्माण होतात. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, व दम्याचे रुग्ण यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. फटाके आपल्या आरोग्यावर थेट वाईट परिणाम करत असतात, त्यामुळे सर्वांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे.
प्राणी-पक्ष्यांचे हाल
काही वर्षांपूर्वी ज्यांच्या चिवचिवाटणे प्रत्येकाची सकाळ आनंदी व गोडं व्हायची, ते अनेक पक्षी हल्ली दृष्टीस सुद्धा पडत नाहीत. कुत्रे- मांजरे, गुरे-ढोरे, निसर्गातील पक्षी हे पशु-प्राणी फटाक्यांचा मोठा आवाज आणि प्रकाश यामुळे घाबरतात. अनेकदा ते घराबाहेर पळतात, त्यांना अपघात होतात, किंवा ते काही काळ खाता-पिताही नाहीत. पक्ष्यांची आवाजाच्या दाबामुळे श्रवणशक्ती कमी होण्याचेही प्रमाण वाढते. माणसांसोबतच इतर जीवसृष्टीची काळजी घेणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, कारण आपल्या प्रमाणेच त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे.
पर्यावरणाचे नुकसान
फटाके फोडल्यामुळे फक्त वायूच नव्हे तर ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होते. फटाक्यांचा मोठा आवाज १०० डेसिबलपेक्षा अधिक असतो, जो कानांसाठी घातक आहे. यामुळे वातावरणातील शांतता भंगते आणि सजीव सृष्टीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. शिवाय फटाक्यांमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक व रसायनं यामुळे जमिनीदेखील प्रदूषित होते.
अपघातांची शक्यता वाढते
प्रत्येक दिवाळीत देशभरात अनेक लहान-मोठे अपघात फटाक्यांमुळे होतं असतात. काही जणांचे हात भाजतात, तर काहींच्या डोळ्यांना इजा होते, काहींचे कपडे पेटतात आणि काही वेळा आग लागून जीवितहानीही होते. लहान मुलं अनेक वेळा फटाके चुकीच्या पद्धतीने फोडतात आणि त्यांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे फटाके केवळ खेळण्याची गोष्ट नाही, तर ते बऱ्याचवेळा नुकसान दायक सुद्धा ठरतात हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.
फटाके मुक्त दिवाळीचे फायदे
फटाके न फोडता दिवाळी साजरी केली, तर त्याचे केवळ मानवालाच नाही तर संपूर्ण निसर्गाला अनेक फायदे होतात. अशा दिवाळीत ध्वनी आणि वायू प्रदूषण होत नाही. त्यामुळे हवा स्वच्छ राहते आणि श्वसनाच्या आजारांपासून मानवाचा बचाव होतो. पशु-पक्ष्यांना त्रास होत नाही. अपघातांचा धोका टळतो. सर्वसामान्य गरीब माणसाला आपल्या परिसरातील रुग्णांना तसेच वृद्धांना शांत आणि सुखद सण अनुभवता येतो. शिवाय, फटाक्यांवर होणारा अनावश्यक खर्चही वाचतो, ज्यातून गरजूंना आवश्यक ती मदत करून आपण एखादा चांगला सामाजिक उपक्रम राबवू शकतो, त्यामुळे फटाके टाळणं म्हणजे केवळ पर्यावरण रक्षण नाही, तर संपूर्ण समाजाची व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आहे.
फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठीचे पर्याय
आज आपण फटाके न फोडता अनेक पर्यायी मार्गाने दिवाळी साजरी करू शकतो. घरी मातीचे दिवे लावा, रांगोळीने घर सजवा, आकर्षक कलाकृतीने कंदील बनवून लावा आणि परिसर सुंदर ठेवा. घरगुती फराळ तयार करा आणि आप्तेष्टांना तसेच गरजूना वाटप करा. लहान मुलांना याचे महत्व पटवून देणाऱ्या लोकशाहीत्यातील गोष्टी सांगा, मैदानी व बौद्धिक खेळ खेळा, आपल्या गल्लीत या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करा. गरजू लोकांना कपडे, अन्न किंवा मिठाई वाटा. झाडे लावा व ते जगवण्यासाठी प्रयत्न करा, विविध सामाजिक उपक्रमात भाग घ्या. सोशल मीडियावरून फटाके मुक्त दिवाळीबद्दल लोकांमध्ये जनजागृती करा.
शेवटी दिवाळीचा मूळ उद्देश हा आनंद, एकता आणि सकारात्मकता पसरविण्याचा आहे. प्रदूषण, त्रास आणि अपघात यांना प्रोत्साहन देणे, हे या सणाच्या मूळ हेतूच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून फटाके मुक्त, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी केली पाहिजे. ही जबाबदारी केवळ सरकार किंवा पालकांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे.
चला तर मग, या दिवाळीत एक शपथ घेऊया - फटाके टाळूया, आनंद वाढवूया, आणि इतरांसाठी नावा आदर्श निर्माण करूया!
प्रा. अंबादास नरसिंगराव पाचंगे,
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,
श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक
मो. ७०५८१९२९६७
pachangeambadas@gmail.com