शिष्यवृत्तीबाबत मोठा निर्णय, आता चौथी आणि सातवीसाठी मिळणार शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीबाबत मोठा निर्णय, आता चौथी आणि सातवीसाठी मिळणार शिष्यवृत्ती
img
वैष्णवी सांगळे
शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. यंदापासून पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच शिष्यवृत्ती रकमेतही चांगली वाढ करण्यात आली आहे. आता पुढील वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यास मान्यता दिली आहे. 


राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू, प्रज्ञावान आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १९५४-५५ पासून ही योजना सुरू आहे. २०१५ मध्ये शिष्यवृत्तीचा स्तर चौथीवरून पाचवी आणि सातवीवरून आठवी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय घटल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद केले होते. त्यामुळे पुन्हा चौथी आणि सातवीत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

ही अंमलबजावणी पुढील वर्षापासून होईल.या चालू वर्षात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. साधारणपणे फेब्रुवारी २०२६ मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येईल. तर २०२६-२०२७ पासून चौथी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे आयोजन केले जाणार आहे.

दरम्यान आता चौथीच्या शिष्यवृत्तीसाठी दर महिन्याला ५०० रुपये म्हणजे प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. सातवीच्या शिष्यवृत्तीलाठी ७५० रुपये प्रति महिन्याप्रमाणे ७ हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शासनमान्य (शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित/ शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र आहे. सीबीएसई, आईसीएसई आणि इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अटींचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थी ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कमाल वय १० वर्षे असावे.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १४ पेक्षा जास्त वय नसावे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा १३ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १७ वर्षे असावे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group